

जळगाव : प्रांजल खेवलकर प्रकरण हे न्यायालयीन प्रक्रियेत असून या विषयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे मत महसूल मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. महसूल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
महाजन म्हणाले, माध्यमांमध्ये जेवढं दाखवलं जात आहे, तेवढंच मी सुद्धा पाहतोय. पोलिस चौकशी सुरू आहे आणि पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई होईल. सध्या या विषयावर काही बोलणे योग्य नाही.
प्रांजल खेवलकर सतत आपले नाव घेत असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया टाळली. यासोबतच भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, “अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र प्रवेश मुंबईत, नाशिक, जळगाव किंवा धुळ्यात कुठे द्यायचा यावर निर्णय प्रलंबित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांसाठी लवकरच प्रवेश कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडे मंत्रीपदासाठी लॉबिंग करत असल्याच्या चर्चांवर महाजन म्हणाले, “ते आमदार आहेत. काही कारणासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. त्याचा अर्थ असा लावू नये की ते मंत्रीपदासाठीच लॉबिंग करत आहेत.”
राज्य सरकारकडून खात्यांतील निधीवाटपावर प्रश्न उपस्थित होत असताना महाजन यांनी स्पष्ट केले की, “हे सर्व तांत्रिक स्वरूपाचे आहे. कुठल्याही खात्यावर अन्याय होणार नाही. ज्या खात्याला जेवढं बजेट मंजूर आहे, तेवढा निधी दिला जाणारच आहे. काही वेळा समायोजनामुळे निधी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवला जातो, पण तो परत दिला जातो.”
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अलीकडेच दिलेल्या न्यायालयीन निकालावर महाजन म्हणाले, “हा निकाल स्वागतार्ह आहे. काँग्रेसच्या काळात काही लोकांवर विनाकारण भगव्या दहशतवादाचा शिक्का मारण्यात आला. त्या लोकांना अनेक वर्ष त्रास सहन करावा लागला. न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केल्याने सत्य समोर आले आहे.”