

Jalgaon District Gang Exile
जळगाव : एरंडोल शहर व परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या सराईत गुन्हेगारी टोळीविरुद्ध जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. जिवे मारण्याचा प्रयत्न, घातक शस्त्रांसह बेकायदेशीर जमाव आणि मारहाणीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुख शुभम महाजनसह तिघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये एक वर्षासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हद्दपारीचा आदेश बजावल्यापासून दोन दिवसांच्या आत संबंधित तिघांनी जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण महसुली हद्दीतून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हद्दपारीच्या कारवाईत टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (वय १८, रा. नागोबा मढी, एरंडोल), पवन प्रकाश मराठे (वय १९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) आणि शुभम उर्फ ‘झिंग्या’ दत्तात्रय पाटील (वय २५, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे.
पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार या तिघांना आदेश मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सन २०२५ मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३८१, १२५ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ९६/२०२५ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
त्यानंतरही गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सन २०२६ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करणे आणि मारहाणीच्या आरोपावरून गुन्हा क्रमांक ३८/२०२६ दाखल करण्यात आला. यापूर्वीही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
संबंधित टोळीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावातील कागदपत्रे व गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासल्यानंतर तिघांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश २२ सप्टेंबर रोजी जारी केला.
एरंडोल परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.