

.ठळक मुद्दे
वन्यजीवांच्या त्रासापासून पिक संरक्षणासाठी तारेचे कुंपण घालून शेतकऱ्याने त्यात धोकादायकपणे वीजप्रवाह सोडला
मृतदेह घटनास्थळीच पडून ; त्यांना ओळखणेही कठीण झाले
असे जीवघेणे उपाय वापरणे कायद्याने गुन्हा असून जीवनासाठी अत्यंत धोकादायक आहे
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे रस्त्याला लागून असलेल्या शेता मध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू विजेच्या शॉक लागून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे याप्रकरणी पोलिसांनी शेत मालकास ताब्यात घेतले आहे.
एरंडोल तालुक्यातील वरखेडी या ठिकाणी शेतामध्ये वन्य जीव जाऊ नये व त्यांनी पिकांचे नुकसान करणे यासाठी झटका तार लावण्यात आलेली होती. वरखेडी गावानजीक एका शेतात सर्व पाचही जणांचे मृतदेह आढळून आले आहे. मयतामध्ये ४० वर्षीय दोन महिला, ४५ वर्षीय एक पुरुष आणि एक मुलगी आणि आणि आठ वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे. या घटनेमध्ये दैवबलवत्तर म्हणून सुदैवाने दीड वर्षाची मुलगी बचावली आहे. शेतात जाताना विजेचा धक्का लागून सर्वांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मयत सर्व आदिवासी पावरा कुटुंब असल्याची माहिती समोर आली असून त्यांची नावे समोल आणण्याचे प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात मसाज रोडवर गट नंबर 21 या शेतात घटना झाल्याची माहिती समोर येत आहे.
सर्व मयत हे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. काम करण्यासाठी ते जळगाव जिल्ह्यात आले होते. जनावर शेतात नुकसान करू नये यासाठी झटका तार लावण्यात आलेली होती. मात्र कुटुंबातील सदस्यांना याचा अंदाज नव्हता, त्यामुळे विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमध्ये शेतमालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डॉ महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक