

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत एका गंभीर किडनी विकाराने त्रस्त महिलेला जीवनदान दिले. मुंबईला जाणारे विमान चुकल्याने चिंतेत सापडलेल्या शीतल पाटील या महिलेला त्यांनी स्वतःच्या चार्टर्ड विमानाने मुंबईत नेऊन रुग्णालयात दाखल केले.
उपमुख्यमंत्री शिंदे हे काल मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहून मुंबईकडे परतत होते. जळगाव विमानतळावर त्यांचे उड्डाण थोडे विलंबित झाले, आणि हाच विलंब शीतल पाटील यांच्यासाठी आयुष्याची संधी घेऊन आला.
शीतल पाटील या जळगाव जिल्ह्यातील असून किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना तात्काळ मुंबईत पोहोचणे आवश्यक होते. मात्र, त्या विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच त्यांचे विमान निघून गेले. अत्यंत निराश झालेल्या शीतल यांच्यासमोर शस्त्रक्रियेची संधी गमावण्याचा धोका उभा राहिला.
विमानतळावर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांची व्यथा मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचवली. महाजन यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली, आणि शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला आपल्यासोबत नेण्याचा निर्णय घेतला. "माझ्या दोन अधिकाऱ्यांना जळगावात ठेवीन, पण माझ्या बहिणीला सोबत घेऊनच जाईन," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईच्या प्रवासात शिंदे यांनी शीतल पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्या उपचारांविषयी विचारपूस केली. तसेच, मुंबईत पोहोचताच विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “उपमुख्यमंत्री शिंदे हे नेहमी गरजूंना मदतीचा हात देतात. विमान चुकलेल्या एका लाडक्या बहिणीसाठी त्यांनी जी तत्परता दाखवली, ती खरोखरच लोकनेत्याच्या भावनेची साक्ष देणारी आहे.”