

जळगाव : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हास्तरीय शासकीय कार्यालयांची निवड करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यातील तब्बल आठ कार्यालयांनी राज्यस्तरावर छाप पाडली आहे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव
सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव
प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, यावल
सहाय्यक संचालक, नगररचना विभाग, जळगाव
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख विभाग, जळगाव
अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव
कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव
या कार्यालयांनी पारदर्शक कार्यप्रणाली, नवोपक्रम, डिजिटल सेवा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यांचा प्रभावी वापर करून आपल्या कामकाजाची गुणवत्ता सिद्ध केली. यामुळेच त्यांची राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड झाली असून, जिल्ह्याच्या प्रशासकीय यशात मोठी भर पडली आहे. या यशाबद्दल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच, त्यांनी आगामी काळातही कार्यक्षमता आणि सेवा गुणवत्तेत सातत्य राखण्याचे आवाहन केले आहे.