

जळगाव : मुख्यमंत्री १०० दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हा परिषदेने उल्लेखनीय यश मिळवले असून, उपविभागीय स्तरावर उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, जळगाव या कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक पशुधन विकास अधिकारी, विवरे (ता. रावेर) यांच्या कार्यालयाला मिळाला असून, तृतीय क्रमांक तालुका वैद्यकीय अधिकारी, रावेर यांच्या कार्यालयाने मिळवला आहे.
या यशामागे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे मार्गदर्शन आणि प्रभावी आढावा बैठका कारणीभूत ठरल्या. त्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालयांना १०० दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ सेवा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आदी बाबींवर भर देत विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संबंधित तीनही कार्यालयांना सन्मानित करण्यात आले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.