

Jalgaon Merchant Assault
जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि.२९) पहाटे मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एका वाहनचालकाने राडा घातल्याची घटना घडली. राजेंद्र नवल बोरसे या वाहनचालकाने ज्येष्ठ व्यापारी जोहर अहुजा यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर लिंबू फेकून मारल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने अहुजा यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जळगाव शहरासह ग्रामीण भागातून शेतकरी व विक्रेते पहाटे चार वाजल्यापासून शेतमाल घेऊन बाजार समितीत दाखल होतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे बाजारात शेतमालाची आवक सुरू असताना राजेंद्र बोरसे हा वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत बाजार आवारात आला. त्याने कोणतेही कारण नसताना ज्येष्ठ व्यापारी जोहर अहुजा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर बोरसे याने अहुजा यांच्या अंगावर लिंबू फेकून मारले आणि त्यांना शिवीगाळ केली. भर बाजारात ज्येष्ठ व्यापाऱ्यासोबत झालेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर व्यापाऱ्यांनी एकत्र येत एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंधित वाहनचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
संबंधित वाहनचालक दारूच्या नशेत होता. त्याने बाजारात येऊन ज्येष्ठ व्यापाऱ्याला शिवीगाळ केली आणि लिंबू फेकून मारले. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून, याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- संजय महाजन, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती