

Doctor duped of Rs 1.65 crore by trapping him in the net of 'Solnoy' app; Jalgaon Cyber Police files a case against the grand fraudsters
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
अमळनेर येथील एका ७० वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरला 'क्रिप्टो करन्सी'मध्ये गुंतवणुकीचा जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला थोडा नफा देऊन विश्वास संपादन करायचा आणि नंतर कोट्यवधी रुपये उकळायचे, या 'चायनीज' स्टाईलने भामट्यांनी हा डल्ला मारला असून, जळगाव सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा टाकला 'हनी ट्रॅप'
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील यशवंत नगरमधील रहिवासी डॉ. अनिल नथ्थु शिंदे (वय ७०) यांना २९ जानेवारी २०२६ रोजी झासी प्रवीण पाटील नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने डॉक्टर साहेबांचा विश्वास संपादन करून त्यांना 'Solnoy' (सोल्नॉय) नावाचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये पैसा लावल्यास मोठा परतावा मिळेल, अशी स्वप्ने त्यांना दाखवण्यात आली.
सुरुवातीला 'साखर' मग 'कडू ओषध'
डॉक्टरांनी सुरुवातीला ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. अवघ्या काही दिवसात भामट्यांनी त्यांना १ लाख ५३ हजार रुपयांचा नफा मिळवून दिला. हा नफा प्रत्यक्ष खात्यात जमा झाल्याने डॉक्टरांचा विश्वास बसला. हाच विश्वास त्यांच्यासाठी महागात पडला. त्यानंतर आरोपींच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत आपल्या बँक खात्यातून तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपये वेळोवेळी ऑनलाईन ट्रान्सफर केले.
न परतावा, न संपर्क!
मोठी रक्कम जमा केल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी परतावा मागितला, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. अनिल शिंदे यांनी जळगाव येथील सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या तक्रारीवरून झासी प्रवीण पाटील, तिचे इतर साथीदार आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाचे चक्र फिरले
जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (पो.नि.) सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाठगीचा तपास सुरू आहे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग झाले आहेत, त्यांची माहिती संकलित केली जात असून यामागे मोठी आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
नागरिकांनो सावध राहा!
अनोळखी लिंकवरून कोणतेही ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करू नका. सुरुवातीला नफा दाखवून नंतर मोठी रक्कम उकळणे ही सायबर गुन्हेगारांची ठरलेली पद्धत आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.