Bhusaval railway news | भुसावळ-दादर स्पेशल सुसाटच! प्रवाशांच्या रेट्यापुढे रेल्वे ने दिला मुदतवाढीचा सिग्नल
जळगाव : वाढती गर्दी आणि प्रवाशांची सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांना अखेर मुदतवाढ दिली आहे. होळी आणि धुळवडीच्या तोंडावर जळगावकर आणि चाकरमान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात असून, या गाड्या आता २८ मार्च २०२६ पर्यंत रुळावर धावणार आहेत. विशेष म्हणजे, आज (दि. २०) पासूनच या गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे.
रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दोन विशेष रेल्वे सेवांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत:
गाडी क्र. ०९०४९/०९०५० (दादर-भुसावळ त्रि-साप्ताहिक): ही गाडी आता २७ मार्च २०२६ पर्यंत धावेल.
गाडी क्र. ०९०५१/०९०५२ (दादर-भुसावळ त्रि-साप्ताहिक): या गाडीला २८ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुन्याच थाब्यांवर आणि वेळेवर या गाड्या धावतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
'आरक्षण' फुल्ल होणार
मुदतवाढ मिळालेल्या ०९०५० आणि ०९०५२ या गाड्यांसाठीचे आरक्षण आज, २० फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. सणासुदीचे दिवस असल्याने अवघ्या काही तासांतच या गाड्यांचे वेटिंग लिस्ट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव आणि भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. नियमित गाड्यांना पाय ठेवायला जागा नसल्याने 'स्पेशल' गाड्यांची मागणी जोर धरत होती. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांची होणारी परवड थांबणार आहे. सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी NTES ॲप किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

