Himachal Cloudburst : हिमाचलमध्ये ढगफुटी, धर्मशालामध्‍ये पुरात दोघांचा मृत्‍यू, ११ बेपत्ता

उत्तराखंडात भूस्खलनाने जनजीवन विस्‍कळीत
 Himachal Cloudburst
हिमाचलच्या कुलू आणि धर्मशाला जिल्ह्यांमध्ये ढगफूटीमुळे माेठे नुकसान झाले आहे.ANI photo
Published on
Updated on

Himachal Cloudburst : नैऋत्य मान्सून पश्चिम हिमालयीन क्षेत्रात आपले रौद्र रूप दाखवत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्‍ये मुसळधार पाऊस पडत आहे. हिमाचलच्या कुलू आणि धर्मशाला जिल्ह्यांमध्ये पाच ठिकाणी ढगफुटी होऊन आलेल्या पुरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण बेपत्ता आहेत. उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम यात्रा मार्गावर मोठे भूस्खलन झाले आहे. चीन सीमेला जोडणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जम्मूच्या कटरा येथील माता वैष्णोदेवी धाम यात्रा मार्गावरील हिमकोटी येथे दरड कोसळल्याने वाहतूक १० तास बंद होती.

हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार

हिमाचल प्रदेशात बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळाबाबत हवामान खात्याने आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. अपेक्षेप्रमाणेच ढगांनी जोरदार वृष्टी केली. कुलू जिल्ह्यातील सैंज, गडसा, मनाली आणि बंजारच्या विविध भागांत ढगफुटीच्या घटना घडल्या. सैंजच्या रैला बिहालमध्ये ढगफुटीमुळे तीन जण वाहून गेले आहेत. धर्मशालाच्या खनियारा येथील मनूणी खड्ड्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाचे १० हून अधिक मजूर वाहून गेले आहेत. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एसडीआरएफची पथके घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. सैंज खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी १५० हून अधिक वाहनांसह २,००० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. सिउंडजवळ रस्ता खराब झाल्याने त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग नाही. लाहौलमध्येही २५ पर्यटक अडकले आहेत.

हिमाचलमध्ये आज येलो अलर्ट, पाच जिल्ह्यांत पुराचा इशारा

हवामान विज्ञान केंद्र सिमलाने हिमाचलच्या अनेक ठिकाणी गुरुवारी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. २ जुलैपर्यंत बहुतांश भागांत हवामान असेच राहील. हवामान खात्याने चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौर या पाच जिल्ह्यांतील काही भागांत आज (दि.२६) पूर येण्याचा इशारा दिला आहे. २६ आणि २७ जून रोजी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. २८ जून ते २ जुलैपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवारी राज्याच्या कमाल तापमानात चार ते पाच अंशांची घट नोंदवण्यात आली.

उत्तराखंडमधील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह पुराचा इशारा

भूविज्ञान मंत्रालयाने (Ministry of Earth Sciences) उत्तराखंडच्या आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह पुराचा इशारा दिला आहे. टिहरी गढवाल, पौडी गढवाल, डेहराडून, नैनिताल, चंपावत, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ येथे आज सकाळपर्यंत पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संबंधित जिल्ह्यांना सूचना पाठवून सतर्क राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने डेहराडून, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि नैनितालमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तराखंडच्या इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजस्थानमध्येही मान्‍सून सक्रिय, अनेक भागांत पूरस्‍थिती

राजस्थानमध्येही मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वाधिक १८० मिमी पावसाची नोंद बारां जिल्ह्यातील मांगरोळ येथे झाली. अनेक भागांत पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली असून सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान खात्याने २५ ते २७ जून दरम्यान बिकानेर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. २७ जूनपासून पूर्व राजस्थानमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्लीत मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा

दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. रोज आकाशात काळे ढग दाटून येत आहेत, पण पाऊस पडत नाही. त्यामुळे नागरिकांना भीषण उकाडा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने बुधावार, २५ जून रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच, त्याच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवसांत संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान सोसाट्याचा वाराही वाहू शकतो.

जम्मू-काश्मीरमध्येही पूर-ढगफुटीचा धोका

हवामान खात्याने आगामी ४८ तासांत जम्मू विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मैदानी भागांत पूर येण्याचा आणि ढगफुटीचा धोका आहे. गेल्या २४ तासांत जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये रियासीच्या कटरा येथे १०९ मिमी, रामबनच्या बनिहाल आणि बटोत येथे प्रत्येकी १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जम्मूमध्ये चार आणि काझीगुंडमध्ये तीन मिमी पावसाची नोंद झाली आहे. काश्मीरमध्ये हलका पाऊस झाला आहे.

, ,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news