

Jalgaon Ahilyanagar criminal gang
जळगाव: अहिल्यानगरमधील आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीचा चोपडा शहर पोलिसांनी मोठा डाव उधळून लावला आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीचा मध्यरात्री थरारक पाठलाग करून पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. अटक आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि कारसह सुमारे ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस गस्तीवर असताना संशयास्पद हालचाली आढळल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. रात्री साडेअकराच्या सुमारास एका कारमध्ये पाच जण बसलेले दिसले, तर दोन जण बाहेर उभे राहून चर्चा करत होते. पोलिसांची चाहूल लागताच बाहेरील दोघे पळून गेले; मात्र कारमधील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींच्या झडतीत दरोड्याची सविस्तर तयारी उघड झाली. त्यांच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतूस, चाकू, दोरी, स्क्रू ड्रायव्हर, टॉर्च तसेच डोळ्यात टाकण्यासाठी मिरचीपूड आढळून आली. यावरून ते मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंगद जाधव (२१), रविंद्र गायकवाड (३२), विशाल पुंडे (२०), डिगंबर पवार (३३) आणि हरिदास शिरसाठ (४०) यांचा समावेश आहे. फरार झालेल्या दोघांपैकी एकाचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पिस्तूल व काडतूस, कार, पाच मोबाईल फोन आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.