

जळगाव : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर विवाह लावून देत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्रसूतीसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही जबरदस्तीने विवाह लावण्यात आला व त्यानंतर तिला सासरी राहण्यास भाग पाडले गेले. या कालावधीत आरोपीने तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तिने केला आहे.
प्रसूतीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना मुलीचे अल्पवयीन वय समजल्याने त्यांनी तत्काळ संबंधित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुलीचे पालक आणि विवाहात सहभागी झालेल्या तिघांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.