

जळगाव : जळगावातील अजिंठा चौफुलीवर बसमध्ये चढताना प्रवाशाच्या खिशातील १५ हजार रुपये काढणाऱ्या तीन पाकीटमारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तिघा आरोपींकडून संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.
यावलचे शेख कलीम शेख इसाक हे सोमवार (दि.1) रोजी पत्नीच्या उपचारांसाठी जळगावात आले होते. काम झाल्यावर ते बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पैसे चोरले. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीद्वारे तपास सुरू केला.
रजा कॉलनी परिसरातील हमीद अय्युब खान, समीर खान अफसर खान आणि शोहेब मेहमूद पटेल यांचा या चोरीत सहभाग असल्याचे उघड झाले. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली असून गिरीष पाटील हे पुढील तपास करत आहेत.