

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) तर्फे पिंप्री गावात काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. "सातबारा कोरा करा", "संपूर्ण कर्जमाफी द्या", "नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित जीआर काढून हेक्टरी 4 हजार रुपये मदत द्या" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनात कल्पिता पाटील, बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पाटील, संजय पाटील, हितेंद्र पाटील, अमोल हरपे, रियाज देशमुख आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जळगाव येथे मुख्यमंत्री फडणवीस आले असता त्यांचा आम्ही निषेध नोंदवतो. भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर कोणतेही आश्वासन पाळले नाही. मे- 2023 मध्ये काढण्यात आलेल्या जीआरनुसार 2 हेक्टरी मदत करणार. त्यानंतर 1 एप्रिल 2024 च्या सुधारीत जीआरनुसार 3 हेक्टरी मदत करणार. परंतु, अवकाळीमुळे केळी आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना हेक्टरी वाढीव मदत देण्याचे आवश्यक होते. परंतु 2023 नुसारच मदत करण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थितीत त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे.
कल्पिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट)