

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र, महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कुठेही अस्तित्व दिसून आले नाही. जळगाव ते अमळनेर रस्त्यालगत लावण्यात आलेल्या बॅनरबाजीमध्ये राष्ट्रवादीचा उल्लेखही नाही. त्यामुळे 'महायुतीत सध्या फक्त युतीच उरली आहे' असे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
धरणगाव तालुक्यातील खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन होत आहे. या स्मारकाची पायाभरणीही त्यांनीच केली होती. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचा गड मानल्या जाणाऱ्या धरणगावमध्ये हा कार्यक्रम होत असल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यात ताकद अजमावण्याची संधी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने धरणगावमधील राजकीय समीकरणेही महत्त्वाची ठरणार आहेत. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होत असल्यामुळे आदिवासी समाज कोणाच्या बाजूने झुकतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आलेल्या फलकांमध्ये केवळ भाजपा व शिवसेनेचेच वर्चस्व दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही बॅनर न दिसल्याने पक्षाच्या सक्रियतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या एका बाजूला सरकलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे.