

Bhusawal Gayatri Bhangale disqualified
जळगाव: भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री रूपचंद गौर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना 23 एप्रिल 2026 पासून नगरसेवक व नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्यात आलेले आहे, असा आदेश नगर विकास विभागाच्या सहज सहसचिव विद्या हम्पय्य यांनी काढला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या पदासाठी अनुसूचित जाती या वर्गामधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गायत्री भंगाळे या विजयी झाल्या होत्या. मात्र 23 एप्रिल 2026 रोजी जात पडताळणी जिल्हा समितीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. गायत्री भंगाळे यांना नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून अपात्र ठरवण्यात आले असून याची नोंद शासकीय राज्यपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गायत्री भंगाळे यांनी भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती या प्रमाणपत्रावर विजय मिळवला होता. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर रजनी सावकारे, प्रमोद सावकारे, राहुल तायडे, संजय तायडे यांनी आक्षेप घेऊन जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. सुनावणी दरम्यान गायत्री गौरव भंगाळे या मुळ उत्तर प्रदेशातील महोबा येथील असून त्यांच्या वडिलांच्या व काकाच्या शालेय नोंदीमध्ये कुर्मी अशी जात नोंद असल्याचे पुरावे सादर केले होते. स्थलांतरित व्यक्तींना दुसऱ्या राज्यात अनुसूचित जातीचा लाभ मिळत नाही, असा युक्तिवादही त्यांनी मांडला होता. त्यानुसार त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.