

MPDA Act Jalgaon
जळगाव : भुसावळ शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुंडांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. वारंवार गुन्हे करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करणाऱ्या आगवाली चाळ परिसरातील सम्राटकुमार सुरेश बनसोडे (वय ३७) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती विघातक कृत्यांना आळा घालणे अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
बनसोडे याच्याविरुद्ध भुसावळ शहर व तालुका पोलिस ठाण्यात मारामारी, धमकावणे, गंभीर दुखापत करणे आदी स्वरूपाचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच मुंबई पोलिस कायद्यान्वये हद्दपारीचा प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. मात्र, या कारवायांनंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याच्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांनी बनसोडे याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ४ सप्टेंबर रोजी सम्राटकुमार बनसोडे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.
या आदेशाची अंमलबजावणी करत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर आणि त्यांच्या पथकाने बनसोडेला ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे, सफौ संजय तायडे, पोलिस हवालदार योगेश पालवे, मनोज येऊलकर, जितेंद्र साळुंखे, पोलिस कॉन्स्टेबल तायडे, जगदीश भोई, लीना लोखंडे, कांतीलाल कोळी यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्यातील योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ सुनील दामोदरे यांनी सहभाग घेतला.