

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) रूग्णालयासाठी एक रूपया चौरस मीटर प्रमाणे एमआयडीसी क्षेत्रात जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे या रूग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून एमआयडीसीच्या ५४२५ चौरस मीटर जागेत रूग्णालय उभारणार आहे.
जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त शासकीय रूग्णालय असावे, अशी जिल्ह्यातील कामागारांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रूग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी पुढाकार घेत सप्टेंबर महिन्यात जागेचा शोध घेतला. यासाठी पाच सदस्यीय समितीने एमआयडीसीतील जागेची पाहणी करून रूग्णालयासाठी भूखंड क्रमांक २१६९४ मध्ये रूग्णालयासाठी ५४२५ चौरस मीटर जागा अंतिम करत एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाचा शासनपातळीवर उद्योग मंत्रालयाकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पाठपुरावा केला.
एमआयडीसीने रूग्णालयांसाठी एक रूपया चौरस मीटर प्रमाणे जागा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक वासुदेव सपकाळे यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळ, मुंबई यांना रूग्णालयासाठी जागा मागणीचा प्रस्ताव दिला आहे.
राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे लवकरच रूग्णालयासाठी जागा हस्तांतरित होणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय ईएसआयसी रूग्णालयासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे महसूल, कामगार महामंडळ, ईएसआयसी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.