

जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क - खानदेशात भरीत पार्टीला विशेष महत्व असून थंडीतील पोषक हवामानामुळे भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि जळगाव येथे होणारी भरीतसाठी असणाऱ्या वांग्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
वांग्यांना किरकोळ बाजारात सध्या 20 ते 25 रुपये किलोचा दर मिळत असून, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भरीत पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असल्याने वांग्यांची मागणी वाढत आहे.
नववर्षाचे स्वागत सर्वत्र वेगवेगळ्या पध्दतीने केले जात असताना जळगाव जिल्ह्यात भरीतच्या पार्ट्यांचे आयोजन विशेष मानले जाते. या पार्ट्या हिवाळा ऋतू संपेपर्यंत सुरु असतात. यंदा पोषक हवामान असल्याने भरीत साठीच्या वांग्यांचे उत्पादन सुरूवातीपासूनच चांगले आले आहे. काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तर वांग्यांचे उत्पादन आणखी जास्त वाढले आहे. परिणामी, ठोक व किरकोळ बाजारात भरीत वांग्यांची सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. वांग्याचे दर बाजार समित्यांमध्ये 10 ते 15 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे आहेत. याशिवाय जळगाव, भुसावळ शहरात मोठ्या संख्येने सुरू झालेल्या भरीत केंद्रांवर 240 रुपये किलोने तयार भरीत मिळत आहे. पुणे येथे पिंपरी, चिंचवड, सांगवी या भागात खान्देशातील मंडळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने तेथेही जळगावातून भरीताची वांगी पाठवली जात आहेत. तेथील बाजारातही खानदेशी भरीत वांगी भाव खात आहेत.
जळगाव जिल्ह्यात हिवाळ्याच्या दिवसात खास भरीत पार्ट्या मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने भरीत पार्ट्यांना सगळीकडे आवडीने आयोजन केले जात आहे. नववर्ष निमित्ताने घरी आलेल्या पाहुणे मंडळींनाही आवर्जून भरीत पार्टीचा पाहुणचार केला जात आहे. भरीत तयार करण्यासाठी लागणारी हिरवी मिरची, कांदा व लसूण पात, कोथिंबीर, मुळा या भाजीपाल्याच्या मागणीतही त्यामुळे वाढ झाली आहे तर नियमित भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे.