

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
घरात पैसे देणे घेण्यावरून दोघा भावांमध्ये झालेला वाद विकोपाला जावून भावाने भावाचा खून केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड वस्ती भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखा मानकू शिंदे (वय-४५) रा. पुर्णाड वस्ती ता. मुक्ताईनगर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मुखा मानकू शिंदे हे आपल्या परिवारासह पुर्णाड वस्ती येथे वास्तव्याला होते. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ पंढरी मानकू शिंदे यांच्यात पैशांवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या रागातून पंढरी याने भाऊ मुखा शिंदे यांच्या डोक्यात दगड टाकला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी आता मयत मुखा शिंदे याचा मुलगा दगडू मुखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरी मानकू शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पंढरी मानकू शिंदे याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे करीत आहे.