

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मान्सून काळात पडणार्या पावसाची नोंद ठेवण्यासाठी महसूल यंत्रणेकडे असलेले पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच आवश्यकतेनुसार नवीन यंत्रे बसविण्यात यावीत, अशा सूचना (Nashik) जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत.
जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून पूर प्रमाणित कार्यपद्धती तयार करून याकरिता सक्षम नोडल अधिकार्याची नियुक्ती करण्यात यावी. मान्सूनमधील संभाव्य अतिवृष्टीमुळे कोविड-19 व इतर साथरोगाच्या रुग्ण सेवांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याचा पूर्वनियोजित आराखडा तयार करण्याचे निर्देश प्राधिकरणाने सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. (Nashik)
मान्सूनपूर्व कालावधीत नदीकाठची अतिक्रमणे काढताना पावसाळ्यात नदी प्रवाहास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. यासोबतच दरड कोसळणारी ठिकाणे व पूर प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात यावीत. या भागातील कुटुंबांची संख्या निश्चित करून त्यांची सुरक्षितस्थळी निवार्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे दवाखाने, शोध व बचाव साहित्य यासारखे आवश्यक साहित्य तसेच प्रशिक्षित पोहणार्या व्यक्तींची पूर क्षेत्रात योग्यवेळी मदत मिळेल याचा आराखडा तयार करण्यात यावा. तसेच नादुरुस्त रस्ते, पूल, विद्युत व दूरसंचार यंत्रणा, शाळा इमारती, धरणे, कालवे आदी सुस्थितीत असल्याबाबत खात्री करण्याच्या सूचना प्राधिकरणाकडून तालुक्यांना देण्यात आल्या.
वाहनांना प्रवेशबंदी करावी
संभाव्य अतिवृष्टीच्या काळात गावपातळीवर संदेश पोहोचविण्यासाठी गावातील पंचायत समिती सदस्य, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांची मदत घेत व्यवस्थापन करावे. ज्या भागात पावसाचे पाणी साचते अशा भागात वाहनांना प्रवेशबंदी करून पर्यटनासाठी जाणार्या पर्यटकांची व वाहनांची नोंद ठेवून त्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत.