नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना तसेच वाहनधारकांना अपघातांना सामाेरे जावे लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. असाच प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरातील विडी कामगार चौकात घडल्याने तेथील अपघातानंतर रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने चौकातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.
खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक खड्डे चुकवूनही अपघातांचे लक्ष ठरत आहे. सोमवारी (दि.१२) पंचवटीच्या अमृतधाम परिसरातील विडी कामगार चौकात रात्री साडेअकरा वाजता ज्ञानेश्वर पाटील या युवकाचा रस्त्यातील खड्ड्यात तोल जाऊन अपघात झाला. अपघातात ज्ञानेश्वर पाटील यांच्या डोके तसेच डोळ्याजवळ तसेच खांद्याला दुखापत झाली. यामुळे अपघातानंतर गर्दी झाली आणि मनपा प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करत तेथील रहिवाशांनी खड्डे बुजविण्याचा निर्धार केला आणि रात्री १२ ला त्यांनी हे काम हाती घेतले. तसेच या नागरिकांनी अपघातग्रस्ताला मदतही केली.
शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महापालिकेने त्वरित दुरुस्ती करून अपघात राेखावेत. रस्त्यात अर्धा फुटाहून अधिक खोलीचे खड्डे पडले आहेत. त्याच खड्ड्यात युवक पडल्याने असा प्रकार होऊ नये या काळजीपोटी आम्ही एकत्रित आलाे आणि खड्डे बुजविले.
– संतोष कदम, स्थानिक रहिवासी