Nashik : चाळीतले उद्योग : पत्र्याची उभारली चाळ; त्यात बेकायदेशीर उद्योगांचा सुकाळ

चाळीतले उद्योग,www.pudhari.news
चाळीतले उद्योग,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे 

एकीकडे उद्योगांसाठी एमआयडीसीकडे जागा शिल्लक नसली तरी, सातपूर-अंबड परिसरात बिनदिक्क्तपणे उभारल्या जात असलेल्या पत्र्याच्या चाळीत दररोज नवा उद्योग सुरू होताना दिसत आहे. 'ना परवानग्या, ना इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता 'कोणीही यावे अन् उद्योग उभारावे' अशा पद्धतीने या चाळीमध्ये उद्योग सुरू आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून या सर्व प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने, पत्र्याच्या चाळीतील उद्योगांना अभयच मिळत आहे.

जिंदाल कंपनीतील अग्नितांडवानंतर औद्योगिक वसाहतीतील फायर ॲण्ड सेफ्टीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उशिरा का होईना कंपन्यांचे नियमित ऑडिट करण्यावरही भर दिला जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही ॲक्शन मोडवर आले असून, विविध परवानग्यांची पडताळणी केली जात आहे. मात्र, पत्र्याच्या चाळीतील उद्योग या सर्व प्रशासकीय बाबींपासून कोसो दूर आहेत. विशेष बाब म्हणजे प्रशासनही डोळेझाक करीत असल्याने, चाळीतील उद्योग सध्या सुसाट आहेत. कोणीही यावे अन् उद्योग उभारावे अशीच काहीशी स्थिती याठिकाणी बघावयास मिळते. दुसरीकडे पत्रा चाळीचे मालक मालामाल होत आहेत. कोणत्याही मूलभूत सुविधा न देता केवळ पत्र्याचे शेड उभारणे हा एकच कित्ता पत्रा चाळ मालकांकडून गिरविला जाताना दिसत आहे. या चाळीत एखादी विपरीत घटना घडल्यास, अत्यावश्यक सेवाही त्याठिकाणापर्यंत पोहोचणे अवघड होईल, अशी स्थिती या पत्रा चाळीची आहे.

या चाळीत सुसज्ज रस्ते नाहीत. शिवाय ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन घेण्यासह इतर सर्वच प्रकारचे उद्योग याठिकाणी सुरू असल्याने प्रचंड धोकादायक स्थितीत पत्र्याची चाळ वाढत आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने जिंदाल कंपनीप्रमाणे याठिकाणी घटना घडू शकते, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

मूलभूत सुविधांची वाणवा

औद्योगिक वसाहत उभारताना त्याठिकाणचे रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांसह अन्य सुविधा एमआयडीसीकडून उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, पत्र्याच्या चाळीत रस्त्यांचीच वाणवा असल्याने इतर सुविधा कोसो दूर आहेत. गल्लीबोळाप्रमाणे असलेल्या येथील रस्त्यांची पावसाळ्यात तर खूपच दयनीय स्थिती असते. सर्वत्र चिखल असल्याने या चाळीत छोटी वाहने चालविणेदेखील अवघड होते.

कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

अत्यंत बिकट स्थितीत याठिकाणी कामगार काम करतात. मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबतच्या कोणत्याही उपाययोजना याठिकाणी दिसून येत नाहीत. या कामगारांची कामगार उपआयुक्तांकडे नोंद नाही. शिवाय कामगारांसाठी असलेल्या शासकीय योजनांपासूनही हे कामगार वंचित आहेत.

चाळ मालक मालामाल

सातपूर, अंबडमधील काही जागामालकांनी पत्र्याची चाळ उभारून त्यातील शेड छोट्या उद्योजकांना भाड्याने दिले आहेत. या उद्योजकांकडून महिन्याकाठी २० ते २५ हजार भाडे हे मालक वसूल करतात. मात्र, चाळ उभारताना या मालकांकडून कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. बहुतांश पत्र्याचे शेड अनधिकृत पद्धतीने उभारल्याची माहितीही समोर येत आहे.

एमआयडीसीचे नियंत्रण नाही

सातपूर आणि अंबड परिसरात खासगी जागांवर पत्र्याच्या चाळी उभारल्या जात आहेत. मात्र, या चाळीवर एमआयडीसीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. ही चाळ खासगी भूखंडावर उभारली असल्याने, त्याच्याशी आमचा संबंध येत नाही.

जयवंत बोरसे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news