Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप वरचढ

नाशिक निवडणूक,www.pudhari.news
नाशिक निवडणूक,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या १९६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.२०) हाती आले. राष्ट्रवादी काँग्रेस ६३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला. भाजपची ५५ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आली आहे. ठाकरे गट २८ जागा पटकावित तिसऱ्या स्थानी आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाने २२ ठिकाणी यश मिळवले आहे. स्वराज्य संघटनेने तीन सरपंच निवडून आणत चंचूप्रवेश केला.

जिल्ह्यातील तिसऱ्या टप्प्यात १९६ ग्रामपंचायतींची रणधुमाळी रंगली होती. या रणधुमाळीत माघारीनंतर सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित १८९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतमोजणीनंतर जिल्ह्याचा कौल समोर आला आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवीन युवकांना संधी दिली. निवडणुकांच्या सलग तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल ठरला असून, पक्षाने ६३ जागा पटकाविल्या. तर राज्यात नंबर एकचा पक्ष ठरलेल्या भाजपला ५५ जागांसह दुसरे स्थान मिळाले आहे.

सर्वाधिक उत्कंठा लागून असलेल्या ठाकरे व शिंदे गटाच्या चुरशीमध्ये ठाकरे गटाने काहीशी आघाडी घेतली. काँग्रेसने ७, माजी खासदार संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे तीन सरपंच व आठ सदस्य निवडून आले. माकपसह अन्य छोटे पक्ष व स्थानिक आघाड्यांनी १८ ठिकाणी यश संपादित केले. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शिंदे गटाने घोडदौड केली आहे. मालेगाव व नांदगावमध्ये अनुक्रमे पालकमंत्री दादा भुसे आणि आ. सुहास कांदे यांनी त्यांचे वर्चस्व सिद्ध केले. मालेगावी शिंदे गटाला ६ व भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत. नांदगाव तालुक्यात १५ पैकी १३ ठिकाणी शिंदे गटाचा भगवा फडकला आहे.

देवळा व चांदवडमध्ये भाजपने गड कायम राखला आहे. चांदवडमध्ये आ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वात पक्षाला १४ जागा मिळाल्या आहेत. देवळ्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची व्यूहरचना यशस्वी ठरली असून, १३ पैकी ११ जागांवर भाजपने विजय संपादित केला. कळवण तालुक्यात राष्ट्रवादीला फटका बसला असून, तेथे माकपने मुसंडी मारली आहे.

मतदारांनी नाकारले प्रस्थापित

जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना साफ नाकारल्याचे चित्र पाहायला मिळते. शिंदे गटाने मालेगाव व नांदगावी वर्चस्व सिद्ध केले असले तरी अन्य तालुक्यांत गटाला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. निकालात येवल्यात भुजबळांना, तर सिन्नरमध्ये कोकाटे गटाला धक्का बसला. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत १० वर्षांनी सत्तापालट झाले असून, आ. दिलीप बनकरांसाठी तो धक्का मानला जातोय.

पक्षनिहाय ग्रामपंचायतींचे संख्याबळ

पक्ष             संख्या

राष्ट्रवादी             ६३

भाजप             ५५

ठाकरे गट             २८

शिंदे गट             २२

काँग्रेस             ०७

स्वराज्य संघटना ०३

माकप व अन्य १८

एकूण             १९६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news