

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा त्याची नोंदणी करणे ग्राहकांसाठी तापदायक ठरते. मात्र, आता नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार असून, मालमत्ता घेतलेल्या स्थळीच ई-नोंदणी करणे शक्य होणार आहे. ही नोंदणी कशी करावी? याबाबत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, अशी सेवा मिळणारे नाशिक हे राज्यातील तिसरे शहर ठरले असून, याआधी मुंबई व पुण्यामध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे आणि सहजिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक तसेच क्रेडाई नाशिक मेट्रोच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुण्याचे श्रवण हार्डीकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे म्हणाले की, महाराष्ट्र शासनातर्फे ई-रजिस्ट्रेशन सुविधा नाशिकमध्ये सुरू झाली असून, यामुळे बांधकाम व्यावसायिक मालमत्तेची विक्रीपश्चात नोंदणी त्याच्याच कार्यालयात करू शकतो. या सुविधेचा लाभ ग्राहकांना होणार आहे. तसेच यामुळे व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येऊन गैरव्यवहारदेखील टाळता येणे शक्य होणार आहेत. ही सुविधा सुलभ प्रकारे राबविण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चित च लाभदायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसेच या सुविधेसाठी अधिकाधिक बांधकाम व्यावसायिकांनी शासनाकडे नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाईचे मानद सचिव गौरव ठक्कर, कार्यशाळेचे समन्वयक अतुल शिंदे, अनिल आहेर, सागर शहा यांच्यासह नाशिकमधील 125 बांधकाम व्यावसायिक तसेच नरेडकोचे सभासद व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. नरेंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.
सेवेसाठी 50 फ्लॅटची अट
ही सेवा देण्यासाठी ज्याच्या प्रकल्पामध्ये 50 पेक्षा अधिक युनिट (फ्लॅट, प्लॉट, दुकाने, ऑफिसेस) आहेत, अशा बांधकाम व्यावसायिकाने या सेवेसाठी राज्य शासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत प्रकल्पातील ग्राहकांना हा लाभ घेता येईल.
नोंदणी प्रक्रियेमध्ये निरंतर सुधारणा होत असून 2002 च्या आधी ही प्रक्रिया पूर्णपणे मॅन्युअल होती. त्यानंतर या प्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले आहे. आज सुरू करण्यात आलेली ई-रजिस्ट्रेशन सेवा या नोंदणी प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, यामुळे ग्राहकांना नोंदणीसाठी ताटकळत राहण्याची गरज राहणार नाही.
– रवि महाजन,
अध्यक्ष, क्रेडाई