

Pimpalner Nagar Panchayat Yogesh Nerkar BJP
पिंपळनेर : पिंपळनेर नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी आज (दि.९) झालेल्या निवडीत भारतीय जनता पक्षाचे योगेश सोमनाथ नेरकर यांची 10 विरुद्ध 9 मतांनी निवड झाली. त्यांनी शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार विजय गांगुर्डे यांचा पराभव केला. यावेळी स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली.यात भाजपाचे डॉ.दयानंद (मिलिंद) कोतकर आणि शिवसेनेचे संभाजी अहिरराव यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी झाली. या निवडीनंतर तिघांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे.
नगरपंचायतच्या सभागृहात सकाळी नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी डॉ.सौ.योगिता जितेश चौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील व सहकारी अधिकारी इंजि.तेजस लाडे,शकील शेख,वैभव यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे योगेश सोमनाथ नेरकर यांनी नामांकन दाखल केले तर शिवसेना शिंदे गटातर्फे विजय साहेबराव गांगुर्डे यांनी नामांकन दाखल केले.यावेळी योगेश नेरकर यांना १० विरुध्द ९ मते मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर भारतीय जनता पक्षातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून डॉ.दयानंद (मिलिंद) कोतकर आणि शिवसेनेतर्फे आमदार मंजुळाताई गावित यांचे विश्वासू कार्यकर्ते तथा तालुका विधानसभा प्रमुख संभाजीराव शिवाजीराव अहिरराव यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे व उपाध्यक्ष चंद्रजीत भामरे व साक्री व पिंपळनेर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपाचे उपनगराध्यक्ष झाल्याने यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून आनंदोत्सव साजर केला. त्यानंतर गावातून मिरवणूक काढली. दुसरीकडे शिवसेना कार्यकर्त्यांनीही निवडीनंतर समाधान व्यक्त केले.निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय बांबळे, पीआय दीपक वळवी, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय किरण बर्गे व निजामपूर पोलीस ठाण्याचे एपीआय मयुर भामरे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.