Women's Day Special | 'नमो ड्रोन दीदी'मुळे नलिनी झाली सक्षम नारी
नाशिक : अंजली राऊत
नाममात्र शुल्कामध्ये शेतात फवारणी करून निर्मित रोजगारातून आत्मनिर्भर होण्याची किमया धुळ्यातील नलिनी देवरे यांनी वेगळी कर्तृत्वसिद्धी अधोरेखित केली. केंद्र सरकारच्या नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत देवरे यांनी अल्पावधीत 70 एकर परिसरातील फवारणीतून पुरेशी अर्थप्राप्ती करताना महिला वर्गाला रोजगार निर्माणाचे नवे कवाड खुले करून दिले आहेत.
केंद्र सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी नमो ड्रोन दीदी ही योजना लागू केली आहे. ड्रोन हे अलीकडे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे साधन झाले आहे. या योजनेंतर्गत महिला बचतगटांना कृषी क्षेत्रातील सेवा पुरवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम केले जाते. धुळे जिल्ह्यातल्या नलिनी देवरे या योजनेमुळे आत्मनिर्भर झाल्या असून, आज त्या स्वकर्तृत्वावर अर्थार्जन करीत आहेत. (Nalini Deore from Dhule district has become self-reliant thanks to the Namo Drone Didi scheme and is now earning money through her own efforts.)
धुळे येथील नलिनी देवरे यांनी पुण्यात 15 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना ड्रोन आणि इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही हॅन), जनरेटर आणि बॅटरी असा पूर्ण 15 लाख रुपयांचा सेट देण्यात आला. नलिनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांवर कीटकनाशक, खत फवारणी करून देतात. यासाठी त्या नाममात्र शुल्क आकारतात. त्यांनी मागील दोन महिन्यांत सुमारे 70 एकरांवर फवारणीकाम केले असून त्यांचे काम आता अव्याहत सुरू आहे. ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या कामाला गती आली असून, त्यातून उपलब्ध झालेल्या रोजगारामुळे त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत.
सुरुवातीला ड्रोन म्हणजे काय, ही संकल्पना मला माहीत नव्हती. मी स्वत: शेतात जाऊन ड्रोन फ्लाय करते. एक एकर कव्हरेज करण्यासाठी ड्रोनद्वारे मला केवळ 7 मिनिटांचा अवधी लागतो. त्यासाठी 300 रुपयेप्रमाणे दर आकारला जातो. आजकाल शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजुरांच्या सहायाने पंपाद्वारे फवारणी केली जाई. तथापि, पंपाद्वारे एक दिवसाचा कालावधी लागतो. आतापर्यंत मी सत्तर एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी केली आहे.
नलिनी देवरे, ड्रोन दीदी, धुळे
ड्रोनमुळे पाणी, औषध व पैशांची बचत
एका दिवसात 10 ते 12 एकर शेत फवारणी केली जात आहे. 7 मिनिटांत एक एकर फवारणी होते. औषधे खूप कमी प्रमाणात लागतात. ड्रोनमुळे संपूर्ण शेतात फवारणी होते. पंपाद्वारे काही ठिकाणी फवारणी होते, तर काही ठिकाणी होतच नाही. 200 ते 300 लिटर पाण्याऐवजी फक्त 100 लिटर पाणी लागते.
हातपंपामुळे मला 17 एकर शेतीसाठी 200 ते 300 लिटर पाणी लागत होते. आता मी ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे 100 लिटर पाण्यामध्ये संपूर्ण फवारणी झाली आहे. जिथे मला 20 हजार खर्च लागायचा, तिथे मला 5 हजार रुपये फवारणी खर्च लागतो आहे. हा माझ्यासाठी मोठा फायदा आहे. नमो ड्रोन दीदीमुळे माझा मोठा फायदा होतो आहे.
दीपक वाघ, शेतकरी, धुळे.
अडचणींवर केली मात
ड्रोनद्वारे एक एकरमध्ये अवघ्या 7 मिनिटांत फवारणी होईल काय? यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. फवारणी झाल्यावर झाडाला रिझल्ट मिळेल का? शेतकऱ्यांना समजावण्यासाठी सुरुवातीचे दोन ते तीन महिने कालावधी गेला. परंतु, अखेर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून आज यशस्वीपणे काम करत आहे.
पतीची खंबीर साथ...
नलिनी देवरे यांचे पती अविनाश देवरे यांची त्यांना साथ मिळाली. त्यांनी त्यांचे काम करून पत्नीला साथ देत त्यांच्या व्यवसायाचा गाडा यशस्वीपणे हाकला आहे. त्यांनी नलिनी यांना, तू करू शकशील. आज महिला विमान चालवतात तुला फक्त ड्रोन चालवायचा आहे असे प्रोत्साहन दिले. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण येथे एका यशस्वी स्त्रीमागे पुरुष खंबीरपणे उभा आहे.
वेळ दिला अन् यश मिळवले
आम्ही शेतकऱ्यांना माहिती समजावून सांगितली. त्यांना मोफत फवारणी करून दिली. त्यांच्या मनातील भीती काढली. सरकारने मोफत यंत्रणा दिली मात्र आमचा केवळ औषधांचा खर्च लागला. इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही हॅन) हीदेखील चार्जिंगची असल्याने पेट्रोल खर्च वाचला. त्यामुळे केवळ वेळ, परिश्रम आणि मनाची तयारी यामुळे आज आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत आहे.

