

Vanchit Bahujan Aghadi Protest Dhule
धुळे : घरगुती वापराच्या गॅसच्या टंचाईच्या विरोधात आज (दि.६) वंचित बहुजन आघाडीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारचे चुकीचे धोरण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली.
धुळे येथील बस स्थानका नजीकच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. यावेळी चूल पेटवून प्रतिकात्मक स्वयंपाक करून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. पंतप्रधानांवर देखील यावेळी घोषणांमधून टीका करण्यात आली.
संपूर्ण देशात गॅसची टंचाई झाली आहे. सरकारने अनेक आश्वासने दिली पण त्याची पूर्तता झाली नाही. विशेष म्हणजे घरगुती वापराचा गॅस आणि इंधन पुरेसे उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र, धुळे जिल्हासह देशभरामध्ये गॅससाठी जनतेला रांगेत उभे राहावे लागत आहे. आज अनेक महिला, कुटुंबे गॅसपासून वंचित आहे. हा प्रश्न देशात कोणीही गंभीरपणे घेत नसल्याने वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उचलला. त्यांच्या मार्गदर्शनात आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रविकांत वाघ, आबासाहेब खैरनार, चंद्रमणी वाघ, शंकर खरात, दिलीप बोरसे, आकाश बागुल, इकबाल तेली, संदीप बागुल, प्रशीक वाघ, बॉबी नागमल, किरण मोरे, अविनाश बागुल, संगिता अहिरे, प्रतिभा बागुल आदी सहभागी झाले होते.