

धुळे : भाजपा महायुतीचे सरकार हे शेतकरी हिताचे आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकर्यांनी घाबरु नये.
नव्या उमेदीने कामाला लागावे. सरकार तुमच्यासोबत आहे ; अशा शब्दात पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांना धीर दिला. धुळे तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांची पिके भुईसपाट झाली आहेत. नुकसान खुपच आहे, असे मत आमदार राम भदाणे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे तालुक्यातील लामकानी, बोरीस, रामी, सैताळे आदी शेती शिवारांना भेटी दिल्यात. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार राम भदाणे, उद्योजक निखील देवरे, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदिया, योगेश सोनवणे, गट विकास अधिकारी सुरेश नेतनराव, मंडळ कृषी अधिकारी बी. के. बोरसे, माजी प स सदस्य बी. सी. महाले, माजी ग्रा. प. सदस्य सुनिल तलवारे, गुलाब धनगर, सागर तलवारे, प्रसाद चौधरी, सागर महाले, ईश्वर जयस्वाल आदी शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणालेत, धुळे तालुक्यासह जिल्हृयात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विविध पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी पंचनामे पादर्शक व अचुक पद्धतीने करण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे, फळबागांचे तसेच शेतीमालाचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून तातडीने शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्यात.
यावेळी आमदार राम भदाणे म्हणाले, धुळे तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत तिसर्यांदा अवकाळी बरसला आहे. रब्बीसह भाजीपाला व फळ बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे पुर्ण झाल्यानंतर तात्काळ अहवाल सादर करावा. म्हणजे नुकसान भरपाई तात्काळ मिळण्याचा मार्ग सुरळीत होईल. दरम्यान यावेळी शेतकर्यांनी पालकमंत्री रावल यांच्याजवळ विविध समस्या मांडल्या आहेत.