

Nagpur Surat Highway Accident
धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील बोरविहीर शिवारात टोलनाक्याजवळ दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या अपघातात दोघा भावांचा मृत्यू झाला. विनोद श्यामा बागुल आणि सागर बागुल अशी मृतांची नावे असून, ते मोरदड गावातील रहिवासी होते. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मोरदड गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद बागुल आणि सागर बागुल हे दोघे भाऊ कामानिमित्त दुचाकीने धुळे येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने आपल्या मोरदड येथील घरी परतण्यासाठी निघाले. रात्री उशिरा त्यांची दुचाकी बोरविहीर शिवारातील टोलनाक्याजवळ आली असता समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली.
या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. विनोद बागुल यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सागर बागुल यांना उपचारासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.
अपघाताची माहिती मिळताच मोरदड गावातील नागरिकांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. मात्र, दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांसह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. या घटनेची पोलिसांनी प्रथमदर्शनी अपघात म्हणून नोंद केली असून, ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.