

सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर मुघलपुरा येथील रहिवासी फिरोजशहा इब्राहिमशहा फकीर (वय ३२) व शकिलशहा जुम्मनशहा फकीर (वय ४५) बाभळे औद्योगिक वसाहतीतील नंदकृष्णा केमिकल कंपनीत कामावर असताना छतावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना (ता.२८) दुपारी १ वाजच्या सुमारास बाभळे तालुका शिंदखेडा येथे घडली.
बाभळे औद्योगिक वसाहतीतील नंदकृष्णा केमिकल कंपनीच्या शेडचे पत्रे जुने झाल्याने ते बदलण्याचे काम सुरू होते. सोनगीरच्या मुघलपुरा भागातील सात ते आठ तरुण हे काम करीत होते. काम करत असताना फिरोजशहा व शकिलशहा यांचा अचानक तोल गेल्याने ते सुमारे ३० फुटावरून खाली कोसळले. यांत दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नेले.
मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना धुळे शहरातील रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना दोघांची प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील २ तरुण मृत्युमुखी पडल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. बुधवारी (ता. २९) दुपारी शोकाकुल वातावरणात सोनगीर येथील कब्रस्तानात त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला.