Student death Accident Dhule
सोनगीर (धुळे) : धुळे तालुक्यातील बुरझड फाट्यावर झालेल्या अपघातात १६ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला. भरधाव वेगाने येणाऱ्या पिक-अप वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत विद्यार्थिनी पूजा पाटील जागीच ठार झाली.
प्रकाश पाटील (वय ४६) आपली मुलगी पूजा हिला घेऊन गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीने शेताकडे जात होते. बुरझड गावातील बसस्थानक चौफुलीजवळ रस्ता ओलांडून ते रस्त्याच्या कडेला उभे असताना, सोनगीरकडून येणाऱ्या एका पिक-अप वाहनाने (एमएच १८, बीझेड १३६६) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत पूजा दुचाकीवरून उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट खांबावर आदळली.
या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वडील प्रकाश पाटील यांनाही किरकोळ मार लागला. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत पूजाला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
पूजा ही बोरिस येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. या प्रकरणी पोलिसांनी पिक-अप चालक हरीशपुरी श्रवणपुरी गोस्वामी (वय १९, रा. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.