

धुळे : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात शिक्षण विभागाने वेतन थांबवल्याने या प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदाराच्या घरावर हल्ला करणे आता शिक्षण विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात अखेर नरडाणा पोलीस ठाण्यात 33 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात शिक्षण विभागाचे वाभाडे निघाले आहे. या प्रकरणांमध्ये वेगवेगळे पुरावे शिक्षण विभागाला सादर करून संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथे राहणारे महेंद्र पुंडलिक देसले यांचा पाठपुरावा सुरू होता. याच कारणामुळे वेतन रोखल्याचा राग मनात धरून जमावाने त्यांच्या घरावर हल्ला चढवला. यावेळी देसले यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण होत असताना गावातील लोकांनी गर्दी केल्यानंतर मारहाण करणाऱ्या या जमावाने पलायन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
दरम्यान देसले यांनी देखील नरडाणा पोलिसांसमवेत संपर्क करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने देसले यांनी नाराजीचा सूर देखील लावला. अखेर नरडाणा पोलीस ठाण्यात देसले यांच्या तक्रारीवरून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे.
त्यानुसार हंसराज सुकलाल पाटील, रावसाहेब छगन जाधव दोन्ही (रा.कलमाडी ता शिंदखेडा), संतोष भिमराव देसले (रा माळीच) ,मुकेश विश्वास पाटील (रा. कंदे ता. जि. नंदुरबार), अमोल विश्वास बेहरे, योगेश सुधाकर पाटील, देवदत्त सुरेश पिंगळे (तिन्ही रा.नंदुरबार), दक्षता लोटन देसले, सुभाष भिमराव देसले, सरला संतोष देसले, प्रतिभा सुभाष देसले, नयन संतोष देसले ,राहुल सुभाष देसले (सर्व रा. माळीच ता शिंदखेडा), किशोर लोटन पाटील (रा. धुळे), राहुल संजय खैरनार (रा. विटाई ता. शिंदखेडा), प्रशांत गोकुळ पाटील (रा. कापडणे ता. शिंदखेडा), जयपाल संजय गिरासे (रा. धांदरणे ता. शिंदखेडा), भटू कोवळे (रा मांडळ ता. अमळनेर), नितीन भिला पाटील (रा. होळ ), प्राजक्ता नामदेव पाटील (रा नरडाणा) , उमेश पाटील (रा. डाबली), तुषार पाटील (रा डाबली), सुरेश सिसोदे (रा नरडाणा), ज्ञानेश्वर आधार पाटील (रा खांडबारा ता नवापुर जि नंदुरबार), गणेश सुभाष कापडी (रा नंदुरबार), भावना अरविंद पाटील (रा नंदुरबार), नारायण सुरेश पाटील (रा डावली), विजय कोकणी , मंगल कोकणी, नरेंद्र नामदेव शिंदे, सोनाली मगन पवार, कविता अंबादास भदाणे (सर्व रा खांडबारा), विशाखा बच्छाव (रा नंदुरबार) यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम ३३३, ३२९, १८९, १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) प्रमाणे, भादवि कलम ३२९, ४४१, १४३, १४८, ३२३,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.