

Sakri Dam Overflow
धुळे : साक्री तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील बहुतांश लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. वरच्या धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून, पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी ( दि. २५) सायंकाळपासून अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात अथवा पुराच्या पाण्यात जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने साक्री तालुक्यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी दिली.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पांझरा आणि जामखेडी मध्यम प्रकल्पातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अक्कलपाडा धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. याशिवाय मालनगाव धरणातूनही पुढील काही तासांत विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने अक्कलपाडा प्रकल्पातील जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी २५ जुलै रोजी दुपारी ४ वाजल्यापासून पुढील २४ तासांत टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पांझरा नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात जाणे टाळावे, नदीकाठावरील पशुधन, शेतीतील मोटारपंप व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या अधोभागातील पांझरा, जामखेडी आणि मालनगाव धरणांमधून विसर्ग वाढल्यास अक्कलपाडा धरणाचे दरवाजे अधिक उघडून नदीपात्रातील विसर्ग वाढविण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए. जे. पाटील यांनी दिली.
साक्री तालुक्यात धोकादायक पूल आणि नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करताना गेल्या तीन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदवळ येथील पांझरा नदीवरील पुलावरून एक अज्ञात व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे. बल्हाणे सजातील गटखळ नदीत भरत सोनू माळी (वय ४०) हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मांजरी येथील जेठीबाई सुकऱ्या कुंवर (वय ६५) या रामपूरजवळील पांझरा नदीपात्रातून वाहून गेल्याने त्यांचाही मृत्यू झाला.
तालुक्यात सलग पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक धोकादायक पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा परिस्थितीत काही नागरिक जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात किंवा पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून कोणत्याही परिस्थितीत प्रवास करू नये, असे आवाहन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी, असेही त्यांनी म्हटले आहे.