

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यापासून मंगळवारी (दि.6) रोजी दुपारी वादळी वारा, जोरदार पाऊस, विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या अर्धा-पाऊण तासातच साक्रीपासून वरच्या भागात तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. तीन वाजेपासून सुरुवात झालेला पाऊस सायंकाळी 7 वाजेपर्यंत ठिकठिकाणी बरसतच होता. काही ठिकाणी गारपीटही झाली. वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून पिकांनाही चांगलाच फटका बसला आहे.
हवामान अंदाजानुसार शेतकरी पाऊस येईल या शक्यतेने आपापली कामे उरकून घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मजूर टंचाई, लग्न समारंभातील अनिवार्य उपस्थिती यामुळे अगदी कमी मजुरांसह कामे शेतकरी करून घेत होते.अनेक शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांदा काढणीचे काम सुरू आहे. काढलेला कांदा चाळीत साठवण करण्याचे काम सुरू आहे.मात्र अवकाळी पावसाने काल शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली.तशातच दहा मिनिटे गारपीट झाल्याने ज्यांचा कांदा अजूनही शेतात पडला आहे किंवा काढणी विना राहिला आहे अशा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.कांदा चाळीजवळ साठवणूक करण्यासाठी वाहून आणलेला कांदाही पावसाच्या पाण्यामध्ये भिजला आहे.
गारपीटीसह जोरदार पाऊस सुरू असताना अत्यंत वेगाने वादळी वारे वाहू लागल्यामुळे काही झाडे उन्मळून पडली तर काही झाडांच्या मोठ-मोठ्या फांद्या मोडून पडलेल्या आढळल्या. शेतशिवारात पावसाच्या पाण्याचे डबके साचले होते. जोरदार पाऊस झाल्यामुळे नांगरटी केलेल्या शेतातही पावसाचे पाणी साचलेले होते. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मक्याची पेरणी केली होती. मका कापणी वर आला असताना मुसळधार पावसासह वेगवान वारा घोंगावू लागल्याने मक्याचे पीक भुईसपाट झाले. मजूर टंचाईमुळे शेती कामांची मजुरी गगनाला भिडली असताना भुईसपाट झालेला मका कापण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकची मजुरी द्यावी लागून आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल, अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. अत्यंत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे देशशिरवाडे येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीचे लोखंडी गेट मोडून खाली पडले.
पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच हरभऱ्याच्या दाण्या एवढ्या आणि अधिक मोठ्या आकाराच्या गारा पडल्या. किमान दहा मिनिटे चिकसे, देशशिरवाडे, देगाव, गव्हाणीपाडा, पिंपळनेर, सामोडे, शेणपुर, मलांजन, उंभरे गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात गारपीट झाली. या गारपीटीमुळे नवीन लागवड केलेला टोमॅटो, मिरची तसेच कोथिंबीर यासह इतरही भाजीपाला पिके नुकसानग्रस्त झाली. काही शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकाचे उत्पादन सुरू आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवार (दि.6) रोजी सायंकाळी 7 वाजे नंतरही पावसाच्या सरी कोसळत होत्या. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता.अवकाळी पावसाचा व गारपिटीचा हवामानाचा अंदाज बुधवार (दि.7) पर्यंत असल्याने पाऊस किती नुकसान करतो या चिंतेत शेतकरी आहेत.