पिंपळनेर : पत्र्याचे शेड येथील बलात्कार घटनेचा निषेध, कडेकोट बंदोबस्त

पिंपळनेर : पत्र्याचे शेड येथील बलात्कार घटनेचा निषेध, कडेकोट बंदोबस्त

पिंपळनेर,जि.धुळे पुढारी वृत्तसेवा: येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या बैलबाजारामधील पत्र्याच्या शेडमध्ये सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर समस्त आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी समाज एकवटल्याचे दिसून आले.आदिवासी संघटनांनी आज पिंपळनेर बंदची हाक दिली होती.त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता कडकहीत बंद पहायला मिळाला.बंदच्या पार्श्वभुमीवर आदिवासी समाजबांधवांनी निषेध मूक मोर्चा काढून नराधमांवर कठोर कारवाईची तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली.

बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व आदिवासी महिला व समाजबांधव बैलबाजार चौफुलीजवळ जमले.येथून मुक मोर्चाला सुरवात झाली.हा मोर्चा बसस्थानक,गणपती मंदिर,बाजार पेठ,खोल गल्ली, मेन रोड,बसस्थानक मार्गे मोठा पूल व बैलबाजार येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला.या ठिकाणी मोचोंचे सभेत रुपांतर झाले.

आळा घालण्याची मागणी

यावेळी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यासह शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली. पिंपळनेर हे आदिवासी भागातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी बंधू-भगिनी कामानिमित्त येत असतात.दि.26 रोजी घडलेली बलात्काराची घटना दुर्दैवी आहे.साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळनेर उपशाखा असलेल्या बैलबाजाराच्या आवारातील पत्र्याचा शेडमध्ये ही घटना घडली.हे ठिकाण टवाळखोर मुले व नशेखोरांचा अड्डा बनला आहे.या ठिकाणी लाईट,सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अशा घटना घडतात. शाळा परिसरातही मुलींचे छेड काढण्याचे प्रकार होतात. महिला सुरक्षित नसल्याचे सांगत यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.यावेळी डीवायएसपी साजन सोनवणे यांनी मोर्चेकऱ्यांना शांततेचे आवाहन केले.तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी डोंगर बागुल,अनिल गायकवाड, संदिप भोये,गणेश गावित,प्रेमचंद सोनवणे यांच्यासह आदिवासी महिला समाजबांधव शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद

आदिवासी संघटनांनी बंदची हाक दिल्यानंतर त्यास व्यापारी व व्यवसायिकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.बंदमुळे पिंपळनेरमधील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. मेडिकल,दवाखाने इ. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.मुक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी साजन सोनवणे, पिंपळनेर पोलीस ठाण्याची सपोनी सचिन कापडणीस, पीएसआय भूषण शेवाळे, पोहेकॉ कांतीलाल अहिरे, लक्ष्मण गवळे यांनी चोखबंदोबस्त ठेवला होता.

आरोपीचे पत्र्याचे शेड जमिनदोस्त

दरम्यान,बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान या संघटनेतर्फे कालच बाजार समिती प्रशासनाला निवेदन देवून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पिंपळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे यांनी आदिवासी महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे बैल मार्केट असलेले पत्र्याचे शेड जमिनदोस्त केले.यावेळी बाजार समितीचे संचालक साईराम अहिरे,ओंकार राऊत, सचिव भूषण बच्छाव उपस्थित
होते.

काय आहे घटना

26 मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नवापूर येथे घराकडे परतणाऱ्या 39 वर्षीय मजूर महिलेवर पिंपळनेर शहरातील सामोडे चौफुली जवळ दोघांनी सामुहिक बलात्कार केला. चौफुलीजवळील बैलबाजार येथे शेडमध्ये घेवून जात तिच्यावर बळजबरीने आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.त्यानंतर दोघे नराधम आपल्या पिकअप वाहनाने पळून गेले.या घटनेनंतर महिलेने पिंपळनेर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.दोन्ही आरोपींवर एट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे या घटनास्थळापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर पोलीस ठाणे आहे.या घटनेनंतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे.

आरोपीची गय केली जाणार नाही

सदर बलात्कार प्रकरणी दोघा आरोपींन विरोधात एट्रोसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दोघा आरोपींना एका तासाच्या आत ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस कस्टडी दिली आहे. आरोपीची कुठलीही गय केली जाणार नाही.त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल.शहरात कुठेही असे वाईट प्रवृत्तीचे लोक त्रास देत असल्यास किंवा उपद्रव करत असल्यास नागरिकांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा कायम तत्पर आहे-साजन सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी,साक्री

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news