

पिंपळनेर: पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने हादरले. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना आज दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता.साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्स अॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला.याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.
या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेशगीर मोजगीर गोसावी (वय ५५) आणि साहील सुरेश गोसावी (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू तसेच साहिल सुरेश गोसावी,पंकज अशोक गीर,सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी,यशवंत गोपाल गोसावी,अनिल गिरी हटुगिरी गोसावी,सोनुगिरी गोसावी,विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
लग्नसोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.