

धुळे : इराण आणि अमेरिके दरम्यान होणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या अंतर्गत पुरवठा विभागाच्या वतीने गॅस पुरवठा एजन्सीच्या विक्री अधिकारी आणि पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. यात भरारी पथक तयार करून जिल्ह्यातील सर्व 38 गॅस एजन्सीवर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे यांनी दिली आहे.
जागतिक युदध परिस्थितीवर घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा ग्राहकांना नियमित व सुरळित होण्या बाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सर्व गॅस सिलिंडर पुरवठा करणा-या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल यांच्या सेल्स ऑफिसर व पुरवठा निरिक्षण अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात सुचना देण्यात आल्या.
सर्व सेल्स ऑफिसर यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या गॅस एजन्सीची दोन दिवसांच्या आत प्रत्यक्ष तपासणी करावी. ग्राहकांना 25 दिवसांच्या अंतराने गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा. तसेच गॅस सिलिंडर साठा तपासणी व वितरण याचा ताळमेळ घेवून प्रत्येक सिलिंडर हे वैयक्तीक ग्राहकालाच देण्यात आले आहे किंवा कसे याची खातरजमा करावी. कोणत्याही परिस्थितीत त्या व्यतिरिक्त गॅस सिलिंडरचे वितरण झाले असल्यास तात्काळ संबंधीत गॅस एजन्सीवर नियमानुसार सेल्स ऑफिसर यांनी कारवाई करावी. तसेच एकही घरघुती सिलिंडर हे व्यावसायिक अथवा नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीला किंवा हॉटेल, रेस्टॉरंट आस्थापनेला वितरण होणार नाही याबाबत संबंधीत गॅस एजन्सी धारकाला ताकिद देण्याबाबतच्या सुचना सेल्स ऑफिसर यांना देण्यात आल्या.
सेल्स ऑफिसर यांनी गॅस एजन्सी तपासणी करून गॅस एजन्सी मध्ये एकूण शिल्लक साठा किती व तो किती दिवसांपर्यत घरघुती वापराची गरज पुर्ण करू शकतो, याबाबत नोंद ठेवावी व त्याबाबत पुरवठा विभागाच्या कार्यालयास अहवाल सादर करावा. असे आदेश यावेळी देण्यात आले.
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत रहावा व सिलिंडरचा काळाबाजार होवू नये, या करीता प्रत्येक तहसिल स्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली. त्यात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा निरिक्षक, वजन व मापे निरिक्षक, गॅस कंपनीचे सेल्स ऑफिसर, स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक, संबंधीत मंडळाचे मंडळाधिकारी यांचा समावेश आहे. सदर पथक नियमिपणे गॅस एजन्सीची तपासणी करेल व सिलिंडर वितरणात कोणतीही अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर संबंधीत कंपनीचे सेल्स ऑफिसरमार्फत प्रचलित कार्यपदधतीनुसार कारवाई करतील. असा इशारा यावेळी देण्यात आला.
भरारी पथकाने आपल्या कार्यक्षेत्रातील सुरु असलेल्या हॉटेल, रेस्टोरंट तपासणी करावी, व घरघुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे आढल्यास संबंधीत पथकाने जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 अन्वये पथकाने कारवाई करावी. असे आदेश देखील यावेळी देण्यात आले. धुळे जिल्ह्यात एकूण 38 गॅस एजन्सी असून यात एचपीसीएल कंपनीचे नऊ, बीपीसीएल कंपनीचे 12 व आयओसीएल कंपनीचे 17 एजन्सी आहेत. तसेच तालुका निहाय एजन्सीची माहिती पुढील प्रमाणे आहे धुळे तालुक्यात एचपीसीएल कंपनीचे ४, बीपीसीएल कंपनीचे ६ व आयओसीएल कंपनीचे ८ अशा १८ एजन्सी आहेत. साक्री तालुक्यात एचपीसीएल कंपनीचे ३, बीपीसीएल कंपनीचे १ व आयओसीएल कंपनीचे ४ अशा ८ एजन्सी आहेत. शिरपूर तालुक्यात बीपीसीएल कंपनीचे ५ व आयओसीएल कंपनीचे ३ अशा ८ एजन्सी आहेत. तर शिंदखेडा तालुक्यात एचपीसीएल कंपनीचे २, आयओसीएल कंपनीचे २ अशा ४ एजन्सी आहेत.