

धुळे : पुढारी वृत्तसेवा; कौशल्य विकास विभागाअंतर्गत आज जिल्ह्यात 12 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्धटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.
या कार्यक्रमास मालपूर, ता. शिंदखेडा येथे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार राजेंद्र पाटील, गट विकास अधिकारी प्रदीप पवार, कौशल्य विकास रोजगार व उद्योग विभागाचे सहाय्यक आयुक्त रा.नि.वाकुडे, नोडल अधिकारी तेजपाल गिरासे, सभापती महावीरसिंग रावल, सरपंच मच्छिंद्र शिंदे, पोलीस पाटील बापू बागुल यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार जयकुमार रावल म्हणाले की, देशामध्ये पहिल्यांदा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची सुरुवात महाराष्ट्र राज्यात होत आहे. या केंन्द्राचे ऑनलाईन उद्धटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून राज्यातील 511 ग्रामपंचायतीमध्ये या केन्द्राची सुरुवात होत असून धुळे जिल्ह्यात चारही तालुक्यातील 12 ठिकाणी या केन्द्राची सुरुवात होत असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या केंन्द्राच्या माध्यमातून विविध रोजगार निर्मितीसाठी विविध कोर्स शिकविले जाणार असून या केंन्द्राच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराचे साधन प्राप्त होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे आपल्या जिल्ह्यात 12 ग्रामपंचायत कार्यालयात उद्धटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले आहे. या केंन्द्रावर कौशल्य विकासाचे विविध कोर्स शिकविले जाणार आहे. प्रथम टप्प्यात 24 प्रकारचे सोलर टेक्निशियल, पहारेकरी, टु व्हिलर मॅकेनिक आदी अभ्यासक्रमावर आधारीत कोर्स शिकविले जाणार असून या केंद्राचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवक व युवती मोठया प्रमाणात उपस्थित होते.
या ठिकाणी झाले उद्धटन
शिरपूर तालुक्यात बोराडी, थाळनेर, होळनाथे. शिंदखेडा तालुक्यात नरडाणा, मालपुर, चिमठाणा, धुळे तालुक्यात सोनगीर, लामकानी, नेर तर साक्री तालुक्यात पिपळनेर, निजामपूर, व सामोडे येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्धटन संपन्न झाले.