सरकारने परदेशातून जास्त भावाने कडधान्य आणून शेतीमालाचे भाव पाडले : अनिल गोटेंचा आरोप

सरकारने परदेशातून जास्त भावाने कडधान्य आणून शेतीमालाचे भाव पाडले : अनिल गोटेंचा आरोप

धुळे पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पार्टीचे सरकार परदेशातून कडधान्य आयात करीत आहेत. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांच्या कडधान्याचे दर पडतील. हे सरकार नेहमी शेतकरी विरोधी धोरण राबवत आहेत. असा आरोप आज माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

धुळ्यातील कल्याण भवनात असलेल्या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात आज ही पत्रकार परिषद झाली .यावेळी तेजस गोटे, प्रशांत भदाणे ,सलीम शेख, विजय वाघ, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी अनिल गोटे यांनी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून शेतकऱ्यांनी आता तरी जागृत व्हावे असे आवाहन केले.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने आपल्या देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव पाडण्यासाठी कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, मॅनमार, आफ्रिका देश, ब्राझील, अर्जेटींना या देशामधून तूर, पिवळा वाटाणा, उडीद, मूग इत्यादी कडधान्यांची ४५ लाख टन इतकी आयात केली. निवडणुकीच्या वर्षात शेतीमालाचे भाव वाढून महागाई वाढल्याचे कारण होवून शहरातील मतदार आपल्या विरूध्द जावू नये. यासाठी आपल्याच देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान उघडे पडले आहे. सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी शेतीमालाच्या वाढत्या भावाचा फायदा परदेशातील शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी व्हावा. आपल्या मर्जीतील उद्योगपतींना लाभ व्हावा यासाठी केलेले कारस्थान समजून घ्यावे असे आवाहन लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे.

सरकारच्या कडधान्य आयातीच्या धोरणातील धरसोडी वृत्तीमुळे कडधान्याचे उत्पादन क्षेत्र गेल्या एका वर्षात १४ ते १६ टक्के कमी झाले आहे. कडधान्याचे मागील पाच वर्षातील उत्पादन २३० लाख टन ,२०१९-२० उत्पादनास बरे भाव मिळाल्याने २५४ लाख टन ,२०२०-२१ मध्ये बाजारातील सतत वाढणाऱ्या भावामुळे २७३ लाख टन उत्पादन २०२१-२२ मध्ये झाले होते. पण नंतर सतत बाजारभाव पाडल्याने २६० टन इतके उत्पादन २०२२-२३ मध्ये झाले. तर, सरकारच्या धोरणातील लहरी निर्णयामुळे २३४ लाख टन उत्पादना इतके खाली आले आहे. २०२२-२३ या वर्षात २४.५ लाख टन कडधान्याची आयात केली आहे. निवडणुकीच्या वर्षात शहरी ग्राहकांना खूष करण्यासाठी आयात धोरणात बदल करून दुप्पटीने म्हणजे ४५ लाख टन अंदाजे ३२ हजार कोटी रूपयांची कडधान्याची आयात केली आहे. एवढेच नव्हे तर, पुढील वर्षी मार्च २०२५ पर्यंत आयात शुल्क माफ केले आहे. एका बाजूला कांद्याला निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावली तर, दुसऱ्या बाजूला कडधान्याची आयात करून देशातील शेतीमालाचे भाव पाडले ,असे शेतकरी विरोधी तसेच शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावण्याचे कट कारस्थान आता उघडे पडले आहे. आयात शुल्क माफ केल्यामुळे व ज्यादा दराने खरेदी होत असल्याने परदेशातील शेतकरी श्रीमंत होत आहेत.
मागील वर्षी टोमॅटोचे दर दोनशे रूपया पर्यंत जाताच नेपाळ मधून दहा लाख टन टोमॅटोची आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था 'घर का ना घाटका' अशी करून टाकली होती. कांदा निर्यात बंदी केली नसती तर, कांद्याला ५ ते ६ हजार रूपये क्वींटल इतका भाव मिळाला असता. शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी या धोरणाचा शांत डोक्याने विचार करावा असे आवाहन देखील गोटे यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे सरकार देशातील महागाई ,बेरोजगारी, शेतीमालाचा भाव याविषयी काहीही बोलत नाही. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात मजूर करण्याचे धोरण सरकार राबवत आहे. शेतकरी आणि शेतमजुरांची अवस्था या दहा वर्षात खराब झाली आहे. मात्र भारतीय जनता पार्टीसह इतर लहान पक्ष देखील याविषयी एकही शब्द बोलत नाहीत .या देशातील शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या वेशीवर गेले. मात्र यावेळी सरकारने दिल्लीच्या वेशीवर करोडो रुपये खर्च करून रस्त्यावर खिळे ठोकले. कृत्रिम भिंती बांधल्या. शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करू दिला नाही. हे शेतकरी याच देशातील नागरिक होते. त्यांना अशा पद्धतीने वागणूक देऊन सरकारने असंवेदनशीलता दाखवली ,असा आरोप देखील यावेळी गोटे यांनी केला.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news