धुळे : शालेय विद्यार्थी सनी साळवे खूनप्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

file photo
file photo
Published on
Updated on

धुळे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून शालेय विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता.  या प्रकरणातील चौघांना आज (दि.२१) जिल्हा सत्र न्यायाधीश डी एम आहेर यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खुनाच्या घटनेतील या आरोपींना कठोर शासन मिळावे, यासाठी धुळे शहरातील विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरीच्या विरोधात निदर्शने केली होती. त्यामुळे आज लागलेल्या निकालाबाबत समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

धुळे जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खून खटल्याबाबत आज (गुरूवारी) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. जिल्हा न्यायाधीश न्या. डी.एम.आहेर यांनी सनी साळवे खूनप्रकरणी आरोपी जितेंद्र फुलपगारे, दिपक फुलपगारे, गुडया उर्फ मयूर फुलपगारे तसेच वैभव गवळे या चार जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त शिक्षेचा, दुसऱ्या कलमात ५ हजार रुपये दंड व १० महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच आरोपी विनोद फुलपगारे याला भादवी कलम ३२४ मध्ये ३ वर्ष शिक्षा व २ हजार रुपये दंड, १४३ मध्ये ३ वर्ष व दंड, १४७ मध्ये १ वर्ष व दंड तसेच १४८ मध्ये २ वर्ष शिक्षा व व दंड, इतर तीन आरोपींचा सदर खटल्यात सहभाग नसल्यामुळे निर्दोष मुक्तता केली. न्यायालयात तपास अधिकारी तत्कालिन उपअधीक्षक सचिन हिरे यांची साक्ष व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी सागर साळवे, घटनेतील जखमी साक्षीदार सुमेध सूर्यवंशी व सौरभ साळवे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. या खटल्यात एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले होते. याप्रकरणी सनीचा भाऊ सागर साळवे याने देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवपूर पोलिसांनी एकूण ८आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. एक आरोपी अद्यापही फरार आहे.

या खटल्याचे कामकाज सहाय्यक सत्र न्यायाधीश डी.एम.आहेर यांच्या समोर चालले. विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. शामकांत पाटील यांनी सरकार पक्षातर्फे जोरदार बाजु मांडली व युक्तिवाद केला. साळवे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपीना दोषी ठरवून ४ आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष शिक्षेचा आदेश पारित केला. खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. शामकांत पाटील यांनी कामकाज यांनी काम पाहिले. सरकार पक्षास सुरुवातीपासून अॅड. विशाल साळवे यांनी मदत केली.

काय होती घटना…

देवपूर चंदन नगर परिसरात राहणारा प्रशांत उर्फ सनी साळवे हा १६ वर्षीय विद्यार्थी आपल्या भावासह दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जयहिंद महाविद्यालय परिसरात जात होता. यावेळी दुचाकीचा कट मारल्याचे कारण सांगत सशस्त्र टोळक्याने धारधार शस्त्राने सनी व त्याच्या भावावर वार केले. यात सनी व त्याच्या भावासह १ मित्र गंभीर जखमी झाला. जखमी सनीला उपचारार्थ देवपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या ठिकाणी संशयित आरोपींनी हातात शस्त्र घेत धिंगाणा घालून सनीच्या उपचारात अडथळा आणून दहशत माजवली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला. मात्र गंभीर जखमी सनीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. शहरासह जिल्ह्यात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. राजकीय व सामाजिक संघटनांनी आरोपींच्या अटकेसाठी रस्त्यावर येत आंदोलने केली. पोलिसांनी चोख बजावत आरोपींना तत्काळ अटक केले. शाळकरी विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा न्यायालयातील वकिलांनी गुंडगिरी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मदत न करण्याचा निर्णय घेतला. सरकारी पक्षातर्फे बाजू मांडणाऱ्या विशेष सरकारी वकील अॅड. शामकांत पाटील यांचा युक्तिवाद पाहता पाच वर्ष आरोपींना जामीन मिळाला नाही. आज लागलेल्या निकालामुळे साळवे कुटुंबासह शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news