

धुळे : विदेशी दारूचा साठा वाहनातून घेऊन जात असताना साक्री-नंदुरबार महामार्गावर सापळा रचून जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि.१२) मुंबई येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाने केली. दारू तस्करीत आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय असून त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या पथकाने वाहन चालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १ कोटी ५९ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निजामपुर गावाच्या हद्दीत साक्री ते नंदुरबार महामार्गावर सहाचाकी ट्रक कंटेनर (के.ए -५३-ए ए-६४६४) अडवून त्याची तपासणी केली असता दारू तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला. कंटेनरसह विदेशी दारूचे १३५० बॉक्स असा एकूण १ कोटी ५९ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. विजय रघुनाथ ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रवणकुमार कृष्णाराम (बिष्णोई) या वाहन चालकाला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, यांच्या आदेशानुसार, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, व उप अधीक्षक रविंद्र उगले तसेच निरीक्षक रियाज खान व निरीक्षक विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या छापा कारवाईत राजाराम सोनवणे, दिलीप नागरे, विकास गायकवाड तसेच धुळे जिल्ह्याच्या अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे दुय्यम निरीक्षक एस. एस. ठेंगडे, जवान अमोल धनगर व निरीक्षक मयुर भांबरे व जवान आहेर तसेच माळी यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास दुय्यम निरिक्षक आर. व्ही. चव्हाण हे करत आहेत.