

Gang that robbed ATM with Rs 16 lakhs in Verul arrested, 4 accused, valuables worth Rs 13 lakhs seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरीच्या लिलॅन्ड वाहनाने ओढून १६ लाख ७७ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीला सोमवारी (दि.२२) पडेगावातून स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. दयासिंग गुलज-ारसिंग टाक (४५, रा. जालना), जीवन विजय वाघ (२८, रा. पडेगाव), सतबिरसिंग हरबनसिंग कलानी (२१, रा. उस्मानपुरा) आणि युवराज ऊर्फ इल्लम बाळासाहेब मंडोरे (४४, रा. बनेवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली. तर पाचवा साथीदार आकाशसिंग बावरी हा फरार आहे. या कारवाईत १२ लाख ७० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी वेरूळ येथील कैलास हॉटेलसमोर असलेल्या एसबीआयची एटीएम मशीन १६ लाख ७७ हजारांच्या रोकडसह दोराच्या साह्याने ओढून बाहेर काढले. गाडीमध्ये मशीन टाकून घेऊन नेले. या घटनेनंतर बँकेचे चॅनेल मॅनेजर विकास निकाळजे यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथक तपासासाठी नेमले.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात चोरीसाठी वापरलेला अशोक लेलंड मिनी टेम्पो हा भक्तीनगर येथून चोरीस गेल्याचे उघड झाले. त्या धाग्याच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन पडेगाव परिसरात सापळा रचण्यात आला. अखेर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि सुधीर मोटे, पोउपनि महेश घुगे, श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, कासीम शेख, सचिन राठोड, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण, कविता पवार, बलबिरसिंग बहुरे, आंनद घाटेश्वर शिवाजी मगर, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली. पुढील तपास खुलताबाद पोलिस करत आहेत.
१० सप्टेंबरच्या पहाटे वाकिंग प्लाजा गार्डन येथे पाच जण भेटले. जीवनची कार असल्याने त्याला सोबत घेतले. तेथून भक्तीनगरला कारमधून गेले. अशोक लेलंड मिनी टेम्पो चोरून वेरूळला गेले. एटीएम मशीनला रोप बांधून मशीन गाडीने बाहेर ओढले. त्याच गाडीत मशीन टाकून आझादनगर, तारांगण सोसायटीमागे नवकार कॉलेजजवळ जीवन वाघच्या घराच्या बांधकामावर आले. कटरच्या (ग्रँडर) सहाय्याने एटीएम मशीन फोडून १६ लाख ७७ हजार आपापसांत वाटणी करून घेतले. टेम्पो मिटमिटा भागात सोडून दिला.
टोळीतील एकाने पैशातून दुचाकी खरेदी केली, तर दोघांनी महागडे मोबाईल घेतले होते. तर पाचवा साथीदार आकाशसिंग बावरी हा फरार असून, त्याच्याकडे उर्वरित रक्कम असल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींकडून ४ लाख १४ हजार ९०० रुपये रोख तसेच कार, दुचाकी, सात मोबाईल, एअर गन, इलेक्ट्रिक कटर, ड्रिल मशीन, धारदार चाकू व इतर साहित्य जप्त करण्यात आले