

Dhule Former Education Officer Arrested
धुळे : बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तथा तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर यांना नाशिक पोलिसांच्या तपास पथकाने धुळे येथून अटक केली.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गत कलम ६६, ६६ (क) व ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासानुसार, नाशिक विभागातील उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रस्ताव नसतानाही मागील तारखांच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. त्यानंतर शालार्थ प्रणालीमध्ये बनावट नोंदी करून संबंधितांना वेतन व थकबाकीची रक्कम मिळवून देत शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची कथित आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासात आतापर्यंत सुमारे १,२०० आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तपासादरम्यान शशिकांत हिंगोणीकर हे सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रस्ताव प्राप्त नसतानाही कथित बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार नांदुळीकर, पोलिस हवालदार चंद्रकांत गवळी तसेच तेजस मते आणि सुनील खैरणार यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून हिंगोणीकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून या गुन्ह्यात औपचारिक अटक करण्यात आली.