

पिंपळनेर, जि.धुळे : तालुक्यातील दिघावे येथे शुक्रवारी (दि.31) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून निघृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संशयित सफेद पिकअप व्हॅन (एम.एच.39ए.डी.1214) मधून पळ काढण्याचा प्रयत्नात असताना सतर्क ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला गावाजवळील मारुती मंदिराजवळ पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.
मृत महिलेचे नाव सुनिता बाबाजी बच्छाव (40) रा. कोटबेल, ता. सटाणा असे आहे. त्या दिघावे ते पिसोळबारी रस्त्यालगतच्या शेतात पतीसोबत वास्तव्याला होत्या. शुक्रवारी सायंकाळी घराच्या मागील बाजूस सुनिता या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर जड,व टणक वस्तूने मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार घटनेनंतर एक अज्ञात व्यक्ती पिकअप गाडी घेऊन गावाकडे पळताना दिसला. ग्रामस्थांनी तात्काळ फोनद्वारे इतरांना माहिती दिली. गावकऱ्यांनी गाडी अडवून पाहणी केली असता चालकाच्या हातावर व चेहऱ्यावर रक्ताचे ठसे आढळले.
गाडीच्या सीटखाली रक्ताने माखलेली लोखंडी सळई सापडली. चौकशीत त्याने आपले नाव रितेश ईश्वर शेवाळे रा.बेहेड, ता. साक्री असे सांगितले. गंभीर जखमी अवस्थेत सुनिता बच्छाव यांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र,उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचा पार्थिव देह कोटबेल (ता. सटाणा) येथे अंत्यसंस्कारासाठी हलविण्यात आला. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी संशयित आरोपी रितेश शेवाळे यास अटक केली आहे. साक्री पोलिस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103 (3), 333 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री पोलिस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.