

Dhule revenue officer bribe Satbara Utara
धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारणाऱ्या धुळे तालुक्यातील काळखेडे येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.
या घटनेतील तक्रारदार यांनी धुळे तालुक्यातील काळखेडे येथे मुलाच्या नावाने शेतजमीन खरेदी केली होती. या खरेदी खतावरून मुलाचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठीचे प्रकरण ग्राम महसूल अधिकारी गोठवाल यांच्याकडे सादर केले होते.
शेज जमिनीवर नाव लावण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी गोठवाल याची भेट घेतली. त्यानंतर सुची क्रमांक दोन जोडून अर्ज दिला. या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे ग्राम महसूल अधिकारी गोठवाल याने एक हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष सचिन साळुंखे यांच्याकडे ही तक्रार दिली. त्यानुसार या पथकाने पडताळणी केली.
यानंतर पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला यावेळी ग्राममहसूल अधिकारी विक्रमसिंग भगवानसिंग गोठवाल यांनी लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्राम महसूल अधिकारी गोठवाल यांना अटक करण्यात आली आहे.