

Songir bus stand demand
सोनगीर : मुंबई-आग्रा महामार्गावर वसलेल्या आणि झपाट्याने शहराकडे वाटचाल करणाऱ्या सुमारे ३५ हजार लोकसंख्या असणाऱ्या सोनगीर गावामध्ये गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेली मध्यवर्ती बस स्थानकाची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. ही मागणी शासन दरबारी लावून धरण्यासाठी सोमवारी रात्री सोनगीर येथील विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांची एक व्यापक बैठक पार पडली.
ज्यामध्ये सर्वानुमते 'सोनगीर मध्यवर्ती बस स्थानक कृती समिती'ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून आगामी काळात सर्वंकष लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला असून, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर मोरे यांची समितीच्या निमंत्रकपदी निवड करण्यात आली आहे.
सुमारे ३५ हजार लोकसंख्या असलेल्या सोनगीर गावातून मुंबई-आग्रा महामार्ग आणि सोनगीर-खेतिया हा प्रमुख राज्यमार्ग जात असल्याने येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र शिरपूर, धुळे आणि दोंडाईचा कडे जाण्यासाठी तीन वेगवेगळे बस थांबे असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या थांब्यांवर निवाऱ्याची सोय नसल्यामुळे वृद्ध, महिला आणि मोठ्या प्रमाणात काॅलेज युवक-युवती, शालेय बालकांना ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत वाहनांची प्रतीक्षा करावी लागते.
विशेष म्हणजे, गावापासून तीन किलोमीटर अंतरावर बाभळे-नरडाणा एमआयडीसी आकार घेत असून, तेथे परराज्यातील आणि शेजारील जिल्ह्यातील कामगारांची मोठी ये-जा सुरू असते, तसेच येथील तांब्या-पितळाच्या भांड्यांची प्रसिद्ध बाजारपेठ पाहता मध्यवर्ती बस स्थानकाची गरज अनिवार्य झाली आहे.
या मागणीसाठी गेल्या 30 वर्षांपासून ग्रामस्थ निवेदन आणि भेटीगाठींच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत, परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. बस स्थानकासाठी ग्रामपंचायतीने पोलीस स्टेशन समोरील खडकावर सुमारे चार एकर जागा आरक्षित ठेवली असली, तरी कोट्यावधी रुपये किमतीची ही जागा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. जर वेळीच निर्णय झाला नाही, तर ही जागा भूमाफियांच्या भक्षस्थानी पडेल, अशी भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली.या पार्श्वभूमीवर, आता अंतिम संघर्षाची तयारी करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प केला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर मोरे होते, तर यावेळी मावळते प्रभारी सरपंच लखन ठेलारी,सामाजिक कार्यकर्ते अशोक महाजन, एल बी चौधरी, प्रमोद धनगर, समस्त सोनगीर पत्रकार संघाचे सदस्य , माजी ग्रा. पं.सदस्य हसन पठाण, माजी ग्रा.पं.सदस्य किशोर पावनकर, माजी ग्रा.पं.सदस्य राहुल देशमुख, शेखर देशमुख, एन जी बागुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित बागुल, निखिलसिंग परदेशी, भूषण बडगुजर, भूषण कासार, जितेंद्र बागुल, शामकांत गुजर, विनोद खलाणे,नितीन सोनार, योगेश सोनवणे गोपाल माळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.