

अंबादास बेनुस्कर
पिंपळनेरः साक्री तालुक्यातील उंभरे ते दिघावे या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या प्रश्नाने आता उग्र स्वरूप धारण केले आहे.गेल्या चार दशकांपासून या रस्त्याचे डांबरीकरण रखडले असून, वारंवार आश्वासने, निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे.संतप्त नागरिकांनी आता राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर करत आगामी सर्व निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
उंभरे-दिघावे हा मार्ग साक्री, काटवान आणि पिसोळ बारीमार्गे नाशिक जिल्ह्याशी संपर्क साधणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच रुग्णवाहिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र सध्या या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतःरात्रीच्या वेळी या परिसरातून दुचाकीने प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. रस्ता जंगल परिसरातून जात असल्याने बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढला आहे.
या रस्त्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत आमदार मंजुळा गावित यांनी यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली होती. तसेच वर्क ऑर्डरही निघाल्याचे सांगण्यात आले होते.मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. निधी मंजूर, वर्क ऑर्डर मंजूर; मग रस्ता कुठे? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. गेल्या सात वर्षांत अनेक लोकप्रतिनिधी,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.वारंवार केवळ आश्वासने मिळाली; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे राहिल्याने नागरिकांचा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर उंभरे, म्हसदी परिसर आणि काटवान भागातील ग्रामस्थांनी एकत्र येत जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे साक्री तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.