

धुळे: साक्री तालुक्यातील गणेशपूर गावाच्या शिवारात पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कांदा भरण्यासाठी आलेला ट्रॅक्टर ट्रॉली सह बुडाल्याने दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. या अपघातात अन्य एका मुलीला वाचवण्यात यश आले असून उर्वरित दोघींना शोधण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत.
साक्री पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणेशपूर गावाजवळ प्रकाश मराठे यांच्या शेतात कांदा भरण्यासाठी ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. विहिरीच्या शेजारी ट्रॅक्टर थांबलेला होता. कुणाला काही कळण्याच्या आत अचानक उत्तर दिशेने गेले आणि थेट विहिरीत जाऊन पडला.
यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, पण तोवर ट्रॅक्टर खोल पाण्यात बुडाले. ट्रॅक्टरवर बसलेले खुशी दाजू ठाकरे (३) व ऋतिका संदीप गायकवाड (३) या दोघी पाण्यात बेपत्ता झाली आहेत. या घटनेत परी संदीप गायकवाड (२) या बालीकेस वाचवण्यात यश आले.
या बालकांशिवाय आणखी काही मुले ट्रॅक्टर मध्ये असल्याची भिती व्यक्त होते आहे.दरम्यान, विहिरीच्या काठावर मोठी गर्दी जमली असून महिलांचा आक्रोश सुरू आहे. बहुतांश नागरिक बचावकार्यात मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. बुडालेल्या मुलींचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल होत आहेत. प्रशासनाकडून घटनास्थळी आवश्यक ती सर्व मदत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.