

धुळे : गौण खनिजाची वाहतूक करणारा भरधाव वेगाने जाणारा डंपर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बस थांब्यावर धडकून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक करण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी दिला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे हा भीषण अपघात झाला आहे. या गावात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बस थांब्यावर काही प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. तर जवळच असणाऱ्या दूध केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यावेळी गौण खनिज भरलेला डंपर भरधाव वेगाने येऊन थेट बस थांब्यातच शिरला. त्यामुळे काही करण्याच्या आतच प्रवासी या गाडीखाली दाबले गेले. या भीषण अपघातामध्ये आशाबाई भिल यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असणारे मका पावरा, लताबाई भिल, विमलबाई भिल या तिघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
हा अपघात होताच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात रवाना करून पोलीस ठाण्याला या अपघाताची माहिती कळवली गेली. यानंतर शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान उपचार घेत असताना मका पावरा यांचे देखील निधन झाले आहे. या अपघातामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणे सुरू केले. या मार्गावरून दररोज असंख्य गौण खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांची रहदारी असते. या संदर्भात बेकायदेशीर गौण खनिजाचा प्रश्न अनेक वेळेस मांडण्यात आला आहे .मात्र त्याकडे दुर्लक्ष केला गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.